Tuesday, August 12, 2014

साखर-खडकवाडी मध्ये कोसळली दरड

साखर-खडकवाडी मध्ये कोसळली दरड

पोलादपूर(नितीन कळंबे)- पोलादपूर पासून सुमारे बारा किलोमीटर असलेल्या खडकवाडी या गावात सकाळी नऊच्या सुमारास दरड कोसळली.

दरड कोसळल्यावर वरून वाहून आलेली माती आणि दगड रस्त्यालगत विखुरले तर काही झाडे रस्त्यावरच आडवी पडली.कामथे,वडघर,आडवळे,मोरसडे गावांकडे होणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.शाळांवर जाणारे शिक्षक, कर्मचारी,तालुक्याच्या ठिकाणी जाणारे प्रवासी यामुळे अडकून पडले.सदर परिस्थिती लक्षात घेऊन खडकवाडी येथील शिवमुद्रा प्रतिष्ठान चे कार्यकर्ते अनिल मालुसरे यांनी गावकऱ्यांना मदतीस घेऊन रस्त्यावर आलेली झाडे आणि दगड हटवण्याचे काम हाती घेतले गावकऱ्यांच्या मदतीने झाडे तोडून हा मार्ग तासाभरातच मोकळा केला गेला.  

रायगड नगरी


Sunday, August 10, 2014

News by Nitin Kalambe in Raigad Nagari(10-8-2014)


Yashavant English medium school Poladpur ..News by Nitin kalambe in Pudhari and Raigad Nagari(10-8-2014)


News of "Tapaal" movie from Laxman Utekar and Mangesh Hadwale by Nitin Kalambe in Raigad Times


News by Nitin Kalambe in Pudhari(10-8-2014)


आखिल भारतीय मराठा महासंघ पोलादपूर कार्यकारिणी निवड सभा संपन्न

आखिल भारतीय मराठा महासंघ पोलादपूर कार्यकारिणी निवड सभा संपन्न

पोलादपूर(नितीन कळंबे)दि.१०-आखिल भारतीय मराठा महासंघ पोलादपूर कार्यकारिणी निवड सभा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.देसाई सर यांच्या उपस्थितीत पार पडली.

पोलादपूर तालुका अध्यक्ष पदावर कोंढवी येथील तरुण कार्यकर्ते श्री.दिनेश शंकर निकम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.उपाध्यक्ष पदावर कोतवाल पंचक्रोशीतील श्री.महेश मनोहर दरेकर तसेच बोरघर येथील श्री.विठ्ठल दगडू पार्टे यांची निवड करण्यात आली.कोंढवी विभागातून देवपुरचे श्री.महादेव धोंडू शिंदे यांची खजिनदार पदी,श्री.भरत चिमाजी चोरगे(साखर),श्री.राजेश रामचंद्र डांगे(कापडे विभाग) यांची सरचिटणीस पदावर निवड करण्यात आली.श्री.संतोष विक्रमराव मोरे(पैठण),श्री.अनंत विठ्ठल घाडगे(करंजे),श्री.विठ्ठल रघुनाथ भिलारे(दिवील),श्री.रवींद्र नारायणराव मोरे(कोंढवी),श्री.मंगेश राघोबा पवार(पार्लेवाडी),यांची जनसंपर्क प्रमुख पदावर निवड करण्यात आली.कर्तव्यदक्ष कार्यकर्त्यांच्या निवडीमुळे संघटनेची आगामी वाटचाल यशस्वी होईल असा विश्वास हितचिंतक,कार्यकर्ते,पदाधिकार्यांनी व्यक्त केला.

पोलादपूर तालुका वाचनालयातर्फे वक्तृत्व स्पर्धा संपन्न

पोलादपूर तालुका वाचनालयातर्फे वक्तृत्व स्पर्धा संपन्न

पोलादपूर (नितीन कळंबे)दि.८ – दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पोलादपूर तालुका वाचनालयातर्फे होणारी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रथम शाळेकडून निवड केली गेली होती.”क्रांतिवीर” हा विषय असलेल्या या स्पर्धेत तालुक्यातील १० शाळांचा समावेश होता.ही स्पर्धा पाचवी,सहावी आणि सातवी अशा तीन गटात घेतली गेली.यापैकी पाचवी मध्ये जनसेवा प्रतिष्ठान शाळेची कु.सानिका विकास कोसबे हिचा प्रथम क्रमांक,सहावी मध्ये  शंकरराव महाडिक शाळेची कु.नताशा नितीन बोरकर हिचा प्रथम क्रमांक तर सातवी मध्ये रा.जि.प.शाळा चरई ची कु.साक्षी संजय कांबळे हिने प्रथम क्रमांक पटकावला.प्रथम क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यास मनगटी घड्याळ,द्वितीय क्रमांकास कंपासपेटी तर तृतीय क्रमांकास मराठी,इंग्रजी व हिंदी भाषेतील निबंध पुस्तके असे बक्षिसांचे स्वरूप होते.

सदर स्पर्धेचे परीक्षक म्हणून एस.एम.महाविद्यालयाचे प्रा.सोमोशी सर,विद्यामंदिर माध्यमिक शाळेच्या पर्यवेक्षिका सौ.अस्मिता तलाठी यांनी काम पहिले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुरेश रा.शेठ यांनी भूषविले तर सूत्रसंचालन जगन्नाथ मुजुमले गुरुजींनी केले.स्पर्धेचे नियोजन ग्रंथपाल निकिता शेठ,लिपिक संतोष महाडिक,शिपाई कीर्ती नगरकर ,सदस्या प्रेमलता शेठ यांनी केले.

श्री.बी.एल.भोसले-माजी सैनिकांचे आधारस्तंभ

श्री.बी.एल.भोसले-माजी सैनिकांचे आधारस्तंभ

पोलादपूर(नितीन कळंबे)- आजी व माजी सैनिकांच्या उन्नतीसाठी जीवन वाहून घेतलेले,सैनिकांचे आधारस्तंभ श्री.बी.एल.भोसले यांचे ३० जुलै २०१४ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी दुख:द निधन झाले.तालुक्यात पावसाची संततधार सुरु असतानादेखील त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी समाजातील सर्व स्तरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बी.एल.भोसले यांचे मातृछत्र बालपणीच हरवले तर वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचे वडील निवर्तले परंतु ठायीच्या प्रचंड इच्छाशक्तीमुळे त्यांनी दिवसा काबाडकष्ट करून,रात्रशाळेत शिकून ते मेट्रिक इंग्रजीमधून उत्तीर्ण झाले.बालपणापासूनच त्यांना देशसेवेची आवड असल्यामुळे ते सैन्यदलात बी.ई.जी.मध्ये दखल झाले.आपली बुद्धिमत्ता,कौशल्य आणि शिस्तपालन या अंगभूत गुणांनी त्यांनी थोड्याच अवधीत वरिष्ठांची मर्जी संपादन केली.त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या कोयना प्रकल्पावर ट्रेझरी पदी सेवेला आरंभ केला.देशसेवा करीत असतानाच माजी सैनिक,सैनिकांच्या विधवा पत्नी तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या प्रश्नांबाबत त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतल्यामुळे त्यांना न्याय देण्यासाठी ते प्रेरित झाले.सन १९५७ साली त्यांनी “खेड तालुका माजी सैनिक संघटने”ची स्थापना केली व खऱ्या अर्थाने माजी सैनिकांच्या सेवेला सुरुवात केली.त्यांनी या कामात स्वत:ला झोकून दिले.प्रसंगी स्व:खर्चाने पिडीत माजी सैनिकांना,त्यांच्या विधवा पत्नींना,कुटुंबियांना पेन्शन तसेच इतर आर्थिक मदती मिळवून दिल्या.शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून त्यांचे पुनर्वसन केले.सैनिकांच्या मुलांच्या वसतिगृहाची सुधारणा करणेसाठी शासनदरबारी पत्रव्यवहार करून वसतीगृहाची सुधारणा करून घेतली.माजी सैनिकांना तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त आल्यानंतर त्यांना विश्रांतीगुह असावे या उद्देशाने त्यांनी शासनदरबारी आवाज उठवून सैनिकी विश्रामगृह बांधण्यास शासनाला भाग पाडले.माजी सैनिकांसाठी काम करताना त्यांना जाणवले कि महाराष्ट्रात माजी सैनिकांच्या पन्नास विविध संघटना आहेत.या सर्व संघटना जर एकाच छताखाली आल्या तर शासनदरबारी माजी सैनिकांच्या पप्रश्नांबाबत,त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात झगडण्यास बळ मिळेल या उद्देशाने त्यांनी १९७४ साली “महाराष्ट्र राज्य आजी व माजी सैनिक संघटनेची” स्थापना केली व संघटनेच्या राज्यभर तेरा शाखांची स्थापना केली.या संघटनेच्या माध्यमातून ७ डिसेंबर १९७५ मध्ये देशसेवा करून तारुण्याचे बळ देशासाठी वाहणाऱ्या व वेळ पडल्यास भारत मातेच्या रक्षणासाठी रक्त सांडवणाऱ्या सैनिकांच्या निवृत्ती नंतर त्यांना समाजात मनाचे स्थान प्राप्त करून देण्यासाठी हुतात्मा चौक,मुंबई येथे लाक्षणिक उपोषण केले व माजी सैनिकांच्या उत्कर्षासाठी तेवीस विविध मागण्यांचे निवेदन सरकारला दिले.त्यांनी माजी सैनिकांच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी निवासी जागा गोरसई,ता-वाडा येथे माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी १०३ एकर जागा मिळवून दिली.उचाट येथील शाळेसाठी सैनिक कल्याण निधी मधून निधी मिळवून दिला तसेच पोलादपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या इमारतीच्या बांधकामासाठी त्यांनी तीन लाख रुपयाचा निधी सैनिक कल्याण निधी मधून मिळवून दिला.परंतु हा निधी प्राप्त होऊन सुद्धा शाळा व्यवस्थापनाने दीर्घकाळ याचा पत्ताच लागू दिला नाही.जेव्हा तत्कालीन खासदार सुधीर सावंत यांनी बी.एल.भोसले यांना फोन वरून निधी दिल्याचे सांगितले तेव्हा त्यांना वाईट वाटले.ज्यांच्या प्रयत्नामुळे निधी मिळाला त्यांनाच निधी मिळाल्याचे कळवले देखील नाही याचे शल्य त्यांच्या मनात अखेरपर्यंत राहिले.    
माजी सैनिकांना मानाने जगाविण्यासाठी,त्यांना पेन्शन साठी कोणापुढेही हात पसरावे लागू नये यासाठी त्यांनी “रायगड जिल्हा सैनिक सहकारी पतसंस्थे”ची स्थापना केली व तिचे काही काळ चेअरमन पदहि भूषविलेया काळात त्यांनी माजी सैनिकांची गरज संस्थेच्या माध्यमातून भागवलीच परंतु सामाजिक जाणीवेतून कारगिल युद्धात धरातीर्थ पडलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांसाठी त्यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून शासनाला मदतीचा हात दिला.
खोपी शिरगाव येथील लघु-पाटबंधारे प्रकल्पामुळे अनेक ग्रामस्थांच्या जमिनी बुडीत क्षेत्रात गेल्या या प्रकल्पग्रस्तांना एकत्र करून त्यांना पुनर्वसन कायद्याच्या नियमानुसार लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी “डुबी प्रकल्प संघर्ष समिती”ची स्थापना केली व त्या माध्यमातून शासनदरबारी  प्रश्न मांडून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला.राजे शिवछत्रपती यांचा अश्वारूढ पुतळा पोलादपूर येथे स्थापन करण्यासाठी त्यांनी “शिवछत्रपती प्रतिष्ठान” ची स्थापना करून प्रमुख कार्यवाह पदाची सूत्रे सांभाळली.
रायगड जिल्हा भूतपूर्व सैनिक काँग्रेस (इं.) याचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.सन १९९० मध्ये राज्याचे गृह व सैनिक कल्याण राज्यमंत्री ना.अरुणभाई मेहता .मा.आमदार कर्नल आर.डी.निकम यांच्या उपस्थितीत पोलादपूर येथे माजी सैनिकांच्या न्याय्य हक्कासाठी मेळावा आयोजित केला होता.या मेळाव्यात पाच हजारापेक्षा जास्त सैनिकांनी उपस्थित राहून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला होता. या मेळाव्यात गरजू माजी सैनिकांना आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले.बी.एल.भोसले यांच्या दिव्य कार्य पाहून मा.खासदार सुधीरजी सावंत यांनी त्यांच्यावर “महाराष्ट्र प्रदेश सैनिक काँग्रेस”च्या उपाध्यक्षपदाची धुरा सोपवली.या काळात दहशतवादी कारवाया थांबवण्याच्या दृष्टीने माजी सैनिकांचा वापर करण्याच्या दृष्टीने  शासनाकडून राबवण्यात आलेल्या योजनेला बी.एल.भोसले यांनी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन संघटनेच्या माध्यमातून दिले.
सन १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत माजी सैनिकांचे प्रतिनिधित्व करण्याच्या दृष्टीने त्यांनी महाड-पोलादपूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.सैनिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी “रक्षक” हे मासिक सुरु केले.किल्लारीच्या भूकंपग्रस्तांना त्यांनी १०००० रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तत्कालीन तहसिलदारांकडे सुपूर्द करून सामाजिक बांधिलकी जपली होती.त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र श्री.अनिल भोसले (सचिव,पोलादपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस),श्री.सुनील भोसले(पत्रकार),श्री.संजय भोसले,तसेच त्यांची मुलगी,स्नुषा,जावई,नातवंडे असा परिवार आहे.