महाडमध्ये एस.टी.बस –टाटा लक्झरीची समोरासमोर टक्कर
१९ प्रवासी जखमी तर एकाची प्रकृती चिंताजनक

पोलादपूर(नितीन कळंबे) – गोरेगाव स्थानकातून सकाळी आठ वाजता सुटलेली
बस नेहमीप्रमाणे महाडमध्ये नोकरी निमित्त येणारे कर्मचारी आणि शाळा-कॉलेजमधील
विद्यार्थी घेऊन गांधारपाले येथे आली.गेले काही दिवसांपासून खालच्या जुन्या
रस्त्याने जाणारी गाडी ड्रायव्हरने आजच हायवे-वरून महाडच्या दिशेने दामटली इतक्यात
एका अवघड वळणावर समोरून येणाऱ्या टाटा एजीसीएल बसला या एस.टी.ने समोरासमोर धडक
दिली.हा अपघात एवढा भीषण होता की बसचा पुढील सर्व भाग चेपून गेला तर बस चा दरवाजा
तुटून टाटा एजीसीएल च्या गाडीमध्ये अडकून बसला.
टाटा एजीसीएल ही गाडी गोव्याहून उरणच्या दिशेने चालली होती.या गाडीचे
स्टेरिंग डाव्या बाजूस असल्याने गाडीचा चालक दिलीप शिरोडकर(विचोली,गोवा) हा थोडक्यात
बचावला तर एस.टी.बस चा चालक सुरेंद्र बाबा पाटील(माणगाव) हा गंभीर जखमी झाला.ह्या
धडकेची तीव्रता जास्त असल्याने पुढील सीट वर आदळून अठरा प्रवाशी जखमी झाले.यामध्ये
सुवर्णा सुदाम निकम(केंबूर्ली) हिचे डोके काचेवर जोरात आदळल्याने काचा डोक्यात
शिरून ती जागेवरच बेशुद्ध झाली.तिला महाड मधील ट्रामा केअर सेंटर मध्ये हलवण्यात
आले.परंतु प्रकृती चिंताजनक झाल्याने पुढील उचारासाठी तिला मुंबई येथील सायन
रुग्णालयात हलवण्यात आले.
या अपघातात वाहक आकाश मनोहर खैरे(वय २२,श्रीवर्धन),श्वेता सुरेश निकम
(वय १६,केंबूर्ली),रसिका अनिल खानविलकर (वय २१,गोरेगाव),हरिश्चंद्र अर्जुन भोनकर
(वय ४५),राजू मनोहर महाडिक(३८, गांधारपाले),रविकांत दिनकर पिंगळे(४७, गांधारपाले),चंद्रकांत
दिनकर पिंगळे (२३,गांधारपाले),कामिनी भागवत (२१,गोरेगाव ),नवीन
जैन(१८,गोरेगाव),समीर बोधीलकर (१९,गोरेगाव),रुक्सार अब्दुलगणी
डावरे(२३,गोरेगाव),स्वप्नाली हनुमंत अडसूळ (१७,गोरेगाव),तस्नीम यासीन
संगे(२४,गोरेगाव) इ.जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच महाड आगारप्रमुख देवधर,वाहतूक नियंत्रक
अंबुर्लेकर तातडीने घटनास्थळी पोचले.क्रेन ने एस.टी.बाजूला करून अर्धा तास ठप्प
असणारा महामार्ग मोकळा केला गेला.जखमींना एस.टी.महामंडळाकडून तातडीने मदत जाहीर
करण्यात आली.


0 comments
Post a Comment