खोपड येथील मोरझोतावर पर्यटकांची तुफान गर्दी
पोलादपूर(नितीन कळंबे) –पूर्ण पोलादपुर तालुक्यातून वर्षासहल जर
काढायची असेल तर मोरझोत धबधब्याला भेट दिल्याशिवाय तुमची सहल सुफळ,संपूर्ण
निश्चितच होणार नाही.सह्याद्रीच्या कुशीतून धाव घेऊन उंचावरून जमिनीवर बेफामपणे
आदळणारे जलप्रपात पोलादपूरमध्ये काही कमी नाहीत परंतु या सगळ्यांमध्ये स्वत:चे
वेगळे अस्तित्व राखून असलेला खोपड-चांदके गावांच्या सीमेवरील फेसाळता मोरझोत धबधबा
कित्येक वर्षांपासून पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.
पोलादपूरपासून सुमारे बावीस किलोमीटरवर असलेला मोरझोत हा पर्यटकांचा “ऑल-टाईम
फेवरेट” धबधबा आहे.तब्बल एक महिना हुलकावणी दिलेल्या पावसाने पर्यटकांच्या उत्साहावर
जवळ-जवळ पाणी फिरवल्याचे दिसून येत होते.मुंबई-पुण्यातून खास मोरझोतवर येणाऱ्या
चाकरमाने पर्यटक गावाकडे फोन करून सातत्याने “मोरझोताला पाणी आले कि नाही ?” अशी
चौकशी करत होते.फेसबुकवर गेल्यावर्षीचे मोरझोतचे फोटो अपलोड होत होते.चांदके येथील
आदिवासी बांधवांना या निमित्ताने जी रोजगाराची संधी निर्माण होते ती संधी देखील
निसर्गाने हिरवल्याचीच चिन्हे दिसून येत होती.
गेला आठवडाभर सुरु असलेल्या संततधार पावसाने मोरझोत बेफामपणे
पर्वताराजींवरून उद्या घेत खाली कोसळू लागला.चाकरमाने सुट्ट्या कधी मिळतात याची
संधी पाहू लागले,काहींनी त्यांचे वीकेंड खास मोरझोत साठी राखून ठेवले,कॉलेज मधील
मुले-मुली सुट्ट्यांच्या दिवसात तर कधी सरळ कॉलेजला दांडी मारून मोरझोत वर मौजमजा
करताना दिसून येऊ लागली.काही हौशी तरुण पुण्या-मुंबईहून वाद्य,डी.जे.,बाजा,स्पीकर
घेऊन येतात आणि बेभानपणे नृत्य करताना दिसून येतात.
हा धबधबा इतर धबधब्यांपेक्षा
सुरक्षित मानला जातो.येथील पाण्याला अजिबात खोली नाही.तसेच डोंगरावरून दोन
टप्प्यांतकोसळल्याने पाण्याचा प्रवाह तितकासा जोरदार नसतो याचा फायदा घेऊन काही
अति-उत्साही पर्यटक थेट धबधब्याखाली उभे राहून वेगाने खाली येणारे पाणी अंगावर
घेणे पसंत करतात.दगडांची संख्या जास्त असल्याने पाय जपून टाकले नाहीत तर घसरण्याचा
संभव असतो तसेच काही बेजबाबदार मद्यपींनी दारूच्या बाटल्या फोडल्याने काचांपासून
सांभाळावे लागते.
निसर्गाने सौंदर्याच दान पोलादपूरच्या पदरात भरभरून दिलं आहे याची
प्रचीती येते.कड्यावरून कोसळून मध्येच उसळी घेणारा फेसाळता धबधबा मंद मंद वाहणारी
हवा ओलीचिंब करून टाकतो,समोरील रस्त्यावर उभे राहिल्यास स्पर्श करणारे तुषार
अंगावर शहारे आणतात.काही पर्यटक धबधब्याच्या आतील अंगाला असलेल्या गुहेतून समोर
कोसळणाऱ्या धबधब्याचे फोटो काढण्याचे धाडस करतात.या पावसाळ्यात सर्वांनी जरूर या
धबधब्याचा आनंद घ्यावा आणि आपल्या वर्तवणुकीने इतरांच्या आनंदाला बाधा येणार
नाही,निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घ्यावी.
0 comments
Post a Comment