Monday, July 28, 2014

मृदंगाचार्य सुनील मेस्त्री जपताहेत मेस्त्री घराण्याची परंपरा

मृदंगाचार्य सुनील मेस्त्री जपताहेत मेस्त्री घराण्याची परंपरा


-by Nitin Kalambe (8446329925)

एखादे शस्त्र,अस्त्र शिकताना ते शरीराचा भाग झाले पाहिजे अशी धारणा शिकणाऱ्याने ठेवली पाहिजे.त्याचप्रमाणे एखादे वाद्यसुद्धा  शरीराचा एक घटक बनू शकते याची खात्री रामदादा मेस्त्री यांच्या चरित्राचं अवलोकन केल्यावर दिसून येते.रात्री झोपल्यावर सुद्धा त्यांची बोटे हृदयाच्या ठोक्यावर नर्तन करीत असत.कधी कधी तर स्नान करतानाच ते वाजवण्यात इतके गर्क होत कि आपले स्नान चालू आहे याचा त्यांना विसर पडे मग कुणीतरी आठवण करून दिल्यावर ते भानावर येतं.साटमबुवा यांच्याकडे पखवाजाचं शास्त्रसुद्ध शिक्षण घेतलेल्या रामदादा मेस्त्री यांनी स्वत:ची स्वतंत्र शैली निर्माण केली.शंकर मेस्त्री आणि राम मेस्त्री या बंधुद्वयींनी उभा महाराष्ट्र आपल्या पखवाज वादनाने मंत्रमुग्ध केला.राम मेस्त्री यांनी आपल्या आयुष्यात पंडित भीमसेन जोशी यांची साथ केली,आकाशवाणीवर पखवाज वादनाचे केले, गजझंपा हा ताल वाजून हत्ती घोडे नाचवले इतकेच नव्हे तर जपानमध्ये जाऊन त्यांनी पखवाज या वाद्याची जपान्यांना भुरळ घातली.त्यांच्या शिष्यांमध्ये त्यांचा किती आदर केला जात होता हे एका उदाहरणावरून सहज स्पष्ट होण्यासारखे आहे.नारायण केसरकर हे रामदादा मेस्त्री यांच्याकडे पखवाज शिकायचे.रामदादांनी त्यांना सांगितले “हे बघ नारायण,तुला अजूनही खूप शिकायचे आहे तेव्हा मी सांगितल्याशिवाय तू समाजामध्ये वाजवायला बाहेर पडू नकोस”.काही काळाने रामदादांचे निधन झाले.कालपरत्वे नारायण केसरकर यांनी वादनात खूप प्रगती केली त्यांच्या वादनातून राम मेस्त्री यांचे वादन प्रतिबिंबित होते असं सुनील मेस्त्री सांगतात.परंतु “मी सांगितल्याशिवाय समाजात वाजवू नकोस” हा गुरूंचा आदेश नारायण केसरकरांनी गुरु गेल्यानंतरही पाळला.इतकी उच्च कोटीची कला हातात असूनसुद्धा गुरुवाक्य प्रमाण मानून ह्या शिष्याने कलियुगात गुरु-शिष्याचं आदर्श म्हणवलं जाईल असं उदाहरण समाजापुढे ठेवल आहे.”धन्य तो गुरु आणि धन्य तो शिष्य !”
रामदादा मेस्त्री,शंकर मेस्त्री यांच्या उत्कर्षाच्या काळात त्यांनी अनेक विद्यार्थी तयार केले.आताचे आघाडीचे पखवाज वादक प्रताप पाटील हे राम मेस्त्री यांचेच शिष्य.समाजाला भारावून टाकणार त्याचं वादन पाहून लहानग्या सुनीलला पखवाज शिकण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली.”काका आज अख्या महाराष्ट्रात विद्यार्थी तयार करता आहात पण तुम्ही मला कधी पखवाज शिकवणार ?” असा प्रश्न सुनीलने काकांना विचारला.तेव्हा राम मेस्त्रींनी जे उत्तर दिले ते आजही सुनील मेस्त्रींना जसेच्या तसे आठवते.ते म्हणाले “हे बघ सुनील,तुला पखवाज शिकवायची काहीच आवश्यकता नाही,तुझ्या रक्तातच ती कला भिनली आहे,तुला मी दोन वर्ष जरी शिकवले तरी तू असा तयार होशील की पखवाज वाजवण्यात तू मलाही मागे टाकशील ” आज हेच शब्द आशीर्वाद रूपाने ग्रहण करून सुनील मेस्त्रींची वाटचाल चालू आहे.
गावाकडे प्राथमिक शिक्षण घेऊन सुनील मेस्त्री चरितार्थासाठी घाटकोपर येथे आपल्या अंगभूत कलेचा वापर करून उत्तम फर्निचर बनवू लागले.येथेच त्यांना नारायण केसरकर यांच्याविषयी माहिती मिळाली त्यांचे वादन पाहून आता आपणही त्यांच्याकडे शिकायला जावे अशी सुप्त इच्छा त्यांच्या मनात आकार घेऊ लागली.अखेर नारायण केसरकर यांच्याकडे त्यांचे प्राथमिक शिक्षणाला सुरुवात झालीच.मुळच्या हिऱ्याला पैलू पडू लागले.गुरूंनी एक बोल शिकवावा आणि शिष्याने लगेच त्याची चौपट करून वाजवून दाखवावा असा प्रकार होऊ लागला.शेवटी एक दिवशी नारायण केसरकर म्हटले “सुनील,यापुढे मी तुला शिकवणार नाही,आता वेळ आली आहे,तू तुझ्या मूळ घराण्याकडे परत जा”.गुरुजींचा आशीर्वाद घेऊन सुनील मेस्त्री आपले काका शंकर मेस्त्री यांच्याकडे शिक्षण घेऊ लागले.दऱ्याखोर्यातून खळखळत,मेहनत घेऊन वाहत आलेलं पाणी मूळ समुद्राला मोठ्या आनंदात मिळालं,एकरूप झालं.काकांनी जीव लावून आपल्या पुतण्याला शिकवलं,अजूनही शिकवत आहेत.रक्ताच्या नात्यांचा हा मर्मबंध गुरु-शिष्याच्या नात्यात परावर्तीत झाला.
सूर्याला ढगांनी कितीही झाकोळले तरीसुद्धा स्व:सामर्थ्याने तो धुकट सारून आपल्या ठायीच्या तेजाने प्रकाश फाकू लागतो.त्याचप्रमाने सुनील मेस्त्री यांच्या वादनाने संगीतरुपी आसमंत दरवळून जाऊ लागला.गुरुवर्य फणसे बाबा घाटकोपर येथे सुनील मेस्त्रींचे वडील भाऊ मेस्त्रींना म्हणाले “तुमच्या सुनील ने आश्चर्यकारक अशी प्रगती केली आहे त्याचं वादन ऐकून जणू काही रामदादा मेस्त्री वाजवत आहेत असाच भास होतो तेव्हा तुमचा हा मुलगा समाजात आमच्यासोबत साथीला हवा”.भाऊ मेस्त्रींनी क्षणाचा विचार न करता त्यांना संकल्पपूर्वक उत्तर दिले “आज महाराष्ट्रात मेस्त्री बंधूद्वयींनी स्वत:चे घराणे निर्माण केले.आज मी वादन करतो परंतु त्यांच्याइतके शिक्षण माझे नाही त्यांची परंपरा सांभाळण्याची ताकद माझ्या वादनात नाही तेव्हा माझ्या या मुलाने राम मेस्त्री,शंकर मेस्त्रींचा पखवाज वाजवावा अशी माझी इच्छा आहे.ज्या पखवाजावरून रामदादा,शंकरदादा खाली बसतील तोच पखवाज सुनीलने वाजवावा,हा आज तुमच्यासमोर मी माझा मुलगा समाजाला वाहिला”.भाऊ मेस्त्रींच्या चेहऱ्यावर एक अपूर्व समाधान होते,म्हतारपणाची काठी वगैरे न मानता किंवा स्वत:चा कोणताही वैयक्तिक स्वार्थ न पाहता या माणसाने आपला पोटचा मुलगा समाजासाठी वाहिला होता,एक संकल्प त्यादिवशी सिद्धीस गेला आणि सुनील मेस्त्रींच्या रूपाने एक हिरा आज वारकरी संप्रदायाला आपल्या अंगच्या प्रकाशाने तालब्रह्मात न्हाऊ घालतो आहे.
यानंतर सुनील मेस्त्रीनी मागे वळून पहिले नाही.उत्तरोत्तर त्यांच्या प्रगतीचा आलेख उंचावता राहिला.अगणित प्रसिद्धी मिळून त्यांचे पाय जमिनीवरच राहिले.कलेच्या अहंकार न बाळगता माळ धारण करून वारकरी झाले.कोणत्याही मानधनाची त्यांनी कधीच अपेक्षा केली नाही.आज मानधनासाठी अडून बसणाऱ्या कलाकारांनी सुनील मेस्त्री यांच्या निस्वार्थी सेवेचा आदर्श ठेऊन वाटचाल करायला हवी.आज मुंबई,पुणे,पोलादपूर,महाड असे त्यांचे क्लासेस चालू आहेत परंतु एकाही विद्यार्थ्याकडे त्यांनी कधीही फी मागितली नाही.कलियुगात हि गोष्ट फार दुर्लभ मानावी लागेल.कलेचा बाजार त्यांनी कधीच मांडला नाही याऐवजी समाजाची सेवा म्हणून त्यांनी ही कला जोपासली,वाढवली.आपल्यामुळे आपल्यापर्यंत चालत आलेल्या परंपरेला बाधा पोचणार नाही याची त्यांनी पावलो-पावली काळजी घेतली.आज तालुक्यात त्यांच्याविषयी ज्या आदराने चर्चा चालतात हे त्यांच्या या वैराग्यरुपी सेवेचं फलित आहे.

     

0 comments

Post a Comment