अचानक आलेल्या पावसाने महाडकरांची उडवली तारांबळ
पोलादपूर\नितीन कळंबे-"ये रे ये रे पावसाचा" राग आळवत असताना आज पाउस खरच आला.सुमारे दहा मिनिटे कोसळलेल्या या धो-धो पावसाने महाडकरांची चांगलीच तारांबळ उडवली.
पावसाची आतुरतेने वाट पाहणारा बळीराजा या पावसाने अल्पकाळ हा होईना सुखावला.राब कोमेजून जाण्याच्या तसेच पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर हा पाउस आशेचा किरण दाखवणारा ठरला.मात्र अचानक आलेल्या या पावसाने छत्री न घेता बाहेर पडलेल्या बेसावध नागरीकांना चांगलेच भिजवून टाकले.
रस्त्यावरील फळविक्रेत्यांनी पावसाला थोपवून धरण्यासाठी मोठ्या छत्र्या,मेणकापड,मोठे प्लास्टिक यांची तजवीज केली होती.मात्र रस्त्याच्या दुतर्फा रानभाजी,रानमेवा विकण्यास बसलेल्या आदिवासी स्त्रिया मात्र टोपल्या तिथेच टाकून आडोसा शोधण्यासाठी एकच धावपळ करताना दिसत होत्या.विद्यार्थी दप्तरातील वह्या-पुस्तके भिजू नयेत म्हणून दुकानांच्या छताखाली गर्दी करत होते. मात्र दहा मिनिटातच हा पाउस थांबला आणि लगेचच नेहमीसारखे कडक ऊन पडले.

0 comments
Post a Comment