पावसाअभावी जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त
दुबार पेरणीचे संकट
पोलादपूर\नितीन कळंबे - यावर्षी पावसाने दरवर्षीपेक्षा काहीशी उशिरा हजेरी लावली.जून महिन्याच्या मध्यात पावसाची चिन्हे दिसल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र दोन-तीन दिवस चांगलाच बरसलेला पाऊस गेले सात-आठ दिवस दडी मारून बसला आहे.पावसाच्या अशा लपाछपीच्या खेळाणे बळीराजा मात्र चिंतातूर झाला आहे.
आवण चांगले उभारून आले असताना पाऊसच गायब झाल्याने रोपे करपून जाण्याच्या मार्गावर आहेत.ज्या शेतकऱ्यांनी शेतात खतांची पेरणी केली आहे त्यांचाही खर्च वाया गेला आहे.बियाणे आणि महागडी खते अशी वाया जाताना पाहून चिंतातूर बळीराजा आकाशाकडे डोळे लाऊन बसला आहे.पावसाची चिन्हे तर नाहीतच आणि पडणारे कडक ऊन पाहून जिल्ह्यातील शेतकरी निराश झाला आहे त्यामुळे दुबार पेरणी करावी लागण्याची तीव्र शक्यता निर्माण झाली आहे.बैलाचे औत यंदा पाचशे ते आठशे रुपये,तसेच मजुरी ३०० ते पाचशे रुपये झाल्याने वाढत्या खर्चाचा प्रश्न सोडवीत असतानाच पावसाने घेतलेल्या परीक्षेमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
रायगड जिल्ह्यात १ ते २३ जूनपर्यंत पडलेला सरासरी पाउस १५०.२९ मिमी. इतका आहे.२३ जून रोजी पोलादपूर मध्ये पडलेल्या शेवटच्या पावसाची नोंद २.०० मिमी.इतकी आहे.मृग नक्षत्र चालू होऊन पंधरवडा उलटला,आषाढ सुरु झाला आहे मात्र पावसाविषयी वेधशाळेसकट सगळीकडे संभ्रमावस्था दिसून येत आहे.

0 comments
Post a Comment