Tuesday, July 8, 2014

तरुण अडकले तीन पत्तीच्या विळख्यात

तरुण अडकले तीन पत्तीच्या विळख्यात

तीन पत्ती : ऑनलाईन जुगाराचे नवीन नाव

पोलादपूर/नितीन कळंबे - सोशल नेटवर्किंग साईट्स वरील कॉन्टॅक्टस वापरून "तीन पत्ती" हा गेम खेळणाऱ्या तरुणांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसते आहे.हा गेम म्हणजे दुसरे तिसरे काही नसून चक्क  ऑनलाईन खेळला जाणारा जुगारच आहे. खेळण्यास अतिशय सोपा असलेला हा गेम तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला आहे.हा गेम भारतात खेळल्या जाणाऱ्या तिर्रट या पत्त्यांच्या खेळासारखा सारखा आहे.

अँड्रॉईडबेस असलेल्या मोबाईल फोन वर गुगल प्ले स्टोअर वरून तीन पत्ती फुकटात डाऊनलोड करता येतो,लगेचच तुम्हाला हाच गेम खेळणाऱ्या इतर व्यक्तींची नावे दिसतात किंवा सोशल नेट्वर्किंग साईट्स वरील  कॉन्टॅक्टस किंवा ई-मेल कॉन्टॅक्टस वापरून आपण आपल्याला हव्या त्या व्यक्तींशी देखील हा जुगार खेळू शकतो.एकदा युझर्स लॉगइन झाले,की सुरु होतो आभासी पैशांचा खेळ..खेळणारा अधिकाधिक गुंतत जातो त्याला वेळेचे भान उरत नाही.ज्याच्याकडे जास्त  कॉईन्स त्याला मोठा टेबल आणि ज्याच्याकडे नाही तो गेम च्या बाहेर.मात्र यामध्ये धक्कादायक बाब अशी आहे कि काही तरुण खरे पैसे देऊन आभासी म्हणजे व्हर्च्युअल  पैसे विकत घेतात त्यामुळे पैसे लावून जुगार खेळण्याचे स्वरूप तीन पत्तीला प्राप्त झाले आहे.याच मार्गाचा वापर करून गुजरात मधील तरुणांनी ५० कोटी रुपये कमावल्याचे उघडकीस आले आहे.

संध्याकाळी महाड मध्ये फेरफटका मारला तर तुम्हाला जिन्याच्या पायऱ्यांवर ओळीने तीन पत्ती खेळत बसलेले तरुण आढळतील.याचप्रमाणे शाळा,कॉलेज,क्लासेस,उद्याने यांमध्येही अनेक मुले-तरुण तीन पत्ती खेळत असल्याचे दिसून येते.हा ऑनलाईन गेम असल्याने या जुगऱ्यावर पोलीस कारवाई करू शकत नाहीत त्यामुळे हा जुगार खेळणार्यांचे चांगलेच फावले आहे.मात्र याप्रकारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे तीन पत्ती पालकांच्या डोकेदुखीचा विषय बनला आहे.तसेच अधिकाधिक वेळ या खेळात गुंतून राहिल्याने पारंपारिक मैदानी खेळांकडे तरुणांचे दुर्लक्ष होऊन आरोग्यविषयक तक्रारी वाढल्या आहेत.तीन पत्ती अधिक वेळ खेळल्याने डोळ्यांवर होणारा दुष्परिणाम ही गंभीर बाब असल्याचे डॉक्टर सांगतात .त्यामुळे वेळीच या जुगाराला आवर न घातल्यास हा केवळ गेम न राहता सामाजिक आरोग्य बिघडवणारा व्हायरस ठरण्याची चिंता तज्ञांनी व्यक्त केली आहे.  

0 comments

Post a Comment