Tuesday, July 8, 2014

पोलादपूर तालुका वाचनालय वाचकांच्या प्रतीक्षेत

पोलादपूर तालुका वाचनालय वाचकांच्या प्रतीक्षेत 


पोलादपूर(नितीन कळंबे) - "ग्रंथ हेच मानवाचे मित्र" असं म्हटलं जातं.पुस्तके ही मानवी जीवन समृद्ध करण्यास मदत करतात.वाचनामुळे ज्ञानात वाढ होते,भाषा समृद्ध होते,वाचनामुळे अनेक व्यक्तींच्या आयुष्यात महत्वपूर्ण बदल घडून आले आहेत तसेच कित्येक लोकांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक झाला आहे परंतु आजकाल सोशल मिडियाच्या माऱ्यापुढे वाचनसंस्कृती कमी झाल्याचे दिसून येत आहे.

पोलादपूर येथील तालुका वाचनालय १९७० मध्ये स्थापन झाले.ग्रंथालय संचालनालय-महाराष्ट्र राज्य,मुंबई अंतर्गत असणारे हे वाचनालय विविध विषयांवर असलेल्या पुस्तकांनी समृद्ध आहे.यामध्ये धार्मिक ग्रंथ,माहितीपर पुस्तके,ऐतिहासिक पुस्तके,काव्य आणि नाट्यविषयक पुस्तके,स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणारी पुस्तके,विविध विषयांवरील कादंबऱ्या,चरित्रे,आत्मचरित्रे,माहितीकोश,बालसाहित्य,कथासंग्रह,शासकीय योजनांची माहिती देणारी पुस्तके,प्रत्येक व्यावसायिक क्षेत्राशी निगडीत असणारी पुस्तके,व्यक्तिचित्रणे,कला तसेच संगीताशी निगडीत पुस्तके,व्यावहारिक पुस्तके,पाककला,संगणक ज्ञान, अशा प्रकारच्या एकूण चौदा हजार पुस्तकांचा समावेश होतो.ही पुस्तके प्रामुख्याने मराठी तसेच हिंदी,इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत.

लोकमत,सकाळ,लोकसत्ता सह सोळा दैनिक वृत्तपत्र,सोळा साप्ताहिके, सोळा मासिके तसेच दिवाळी अंक येथे वाचावयास मिळतात.वृत्तपत्रांचे वाचन करण्यासाठी येथे स्वतंत्र वृत्तपत्र कक्ष आहे.

येथील सभासदत्वासाठी एका महिन्याचे केवळ दहा रुपये इतके नाममात्र शुल्क आकारले जाते.सर्व पुस्तकांचे वर्गीकरण केल्यामुळे पुस्तके शोधणे सोपे जाते.सावित्री नदीची खळखळ ऐकत येथे बसून पुस्तक वाचण्याची मजा काही औरच..! सकाळी साडेआठ ते दहा तर संध्याकाळी साडेचार ते सात या वेळात वाचनालय चालू असते तर सोमवार हा सुट्टीचा दिवस असतो.काही अडचण आल्यास येथील ग्रंथपाल निकिता शेठ,लिपिक महाडिक तसेच शिपाई कीर्ती नगरकर मदत करण्यास सदैव तत्पर असतात.

वाचनाची सवय ही बालकांना लहानपणापासून लावणे अतिशय गरजेचे आहे.लहानपणी लावलेली सवय ही टिकून राहून मुले मोठेपणी अधिकाधिक वाचनासाठी प्रवृत्त होतात असे संशोधनातून आढळून आले आहे.लहानपणी गोष्टीची पुस्तके वाचण्याची सवय लावलेल्या मुलांमध्ये जवळजवळ नव्वद टक्के मुलांमध्ये नंतर मोठेपणी वाचनाची आवड स्वयंप्रेरणेने निर्माण होते.त्यामुळे भावी पिढी सुसंस्कृत करण्यासाठी वाचनसंस्कृती जपणे गरजेचे आहे.लहानपणीच वाचनप्रक्रियेतील आनंदाची ओळख झाली नाही,वाचनाची आवड रुजली नाही तर मात्र एका सुंदर अनुभूतीला ही मुले कायमची मुकतील.

मोबाईल वाचनालये,इंटरनेट वरील ऑनलाईन वाचनालये,गाडीवरील फिरती वाचनालये,ई-बुक्स इ.येनकेन प्रकारे समाजाला वाचनाची सवय लावण्यासाठी झटत असतात मात्र एवढे सुसज्ज वाचनालय असून सुद्धा त्याकडे पोलादपूरकरांनी साफ दुर्लक्षच केल्याचे दिसून येत आहे.चौऱ्याहत्तर टक्के सुशिक्षित असलेल्या या तालुक्यात अर्धा टक्काही वाचक नाहीत यापेक्षा दुर्दैव आणखी काय असू शकेल ?

0 comments

Post a Comment