Tuesday, July 8, 2014

ओंबळीच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून केली रस्त्याची डागडुजी


ओंबळीच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून केली रस्त्याची डागडुजी 


पोलादपूर\नितीन कळंबे(दि.२८) - प्रशासनाकडून कोणत्याही मदतीची वाट बघत बसण्यापेक्षा ओंबळीच्या ग्रामस्थांनी,शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी तब्बल सहा ते सात तास  श्रमदानातून खेड-ओंबळी रस्त्याची डागडुजी केली.प्रशासनाच्या मदतीची नुसती वाट बघून स्वत: काहीच क्रियाशीलता न दाखवणाऱ्या लोकांना या विद्यार्थ्यांनी आदर्श घालून दिला आहे.

ओंबळी हे गाव पोलादपूरपासून १७ किलोमीटर अंतरावर आहे.हे तंटामुक्त गाव असून रत्नागिरी व रायगड जिल्ह्याच्या हद्दीवर येते.येथील श्रीसंत पोपट महाराज ताजणे या विद्यालयात रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील  दहिवली व घोगरा या गावांतील ६० ते ७० मुले शिकतात.ही गावे ओंबळीपासून सुमारे सात ते आठ किलोमीटर अंतरावर असल्याने त्यांना शाळेत येण्यासाठी  एस.टी.बस हे अत्यंत महत्वाचे माध्यम होते.मात्र ह्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात  खड्डे असल्याने आणि ठीकठिकाणी मोऱ्या तुटलेल्या असल्याने ही बस बंद करण्याचा प्रस्ताव खेड आगारात विचाराधीन होता.त्यामुळे दिवसातून सकाळी साडे दहा वाजता आणि संध्याकाळी साडेचार वाजता येणाऱ्या दोन बस बंद होऊन शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची भीती निर्माण झाली.

ओंबळी ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी श्रमदानातून रस्त्याची डागडुजी करण्याचा निर्णय घेतला.सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत तीन किलोमीटर पर्यंत ह्या रस्त्यावरील खड्डे भरण्यात आले.यामध्ये युवा कीर्तनकार आणि ओंबळी गावचे सरपंच रवींद्र महाराज सकपाळ,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गोपाळ चिकणे आणि इतर ग्रामस्थ,श्रीसंत पोपट महाराज ताजणे विद्यालयातील मुख्याध्यापक पाटीलसर ,दीपक सकपाळ सर,संदीप सकपाळ,मदाले सर,वितमल सर, तसेच शिपाई दिलीप बुवा चिकणे आणि बाबू ढेबे,विद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनिंचा उत्साही सहभाग होता.

अशाप्रकारे केलेल्या कामानंतर येणाऱ्या एस.टी. चालकांकडे त्यांनी रस्त्याविषयी विचारणा केली असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.एस.टी.आणण्यास आता कोणतीही अडचण नसल्याचे त्यांनी सांगितले.याविषयी खेड आगाराप्रमुख श्री.निकम आणि श्री.जंगम यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सदर रस्ता सुधारला असेल तर बससेवा सुरळीत सुरु ठेवण्यासाठी आम्हाला कोणतीही अडचण नाही असे सांगितले.श्रमदानाला मिळालेल्या या यशामुळे ओंबळीच्या विद्यार्थ्यांचे कौतुक तालुक्यातील सर्व स्तरांतून होत आहे.


0 comments

Post a Comment